अहिल्यानगरचा पतंग महोत्सव
*माझं अहिल्यानगर*
*संक्रांत आली की नगरचे पतंग आठवतात!*
*नगरमधे तयार झालेले खास नगरी पतंग आज* *बघायला सुद्धा मिळत नाही*.
*नगरमधील*
*पतंग उत्सव*
काटला रे काटला!
लांब नेऊन काटला!
काय भारी मांजा आहे रे तुझा!
मग!
आता पर्यंत पाच काटले आहेत...!
*नगर म्हणजे पतंग व पतंग म्हणजे नगरच*
*इतके घट्ट नाते पतंग आणि नगरचे आहे*.
दिवाळी नंतर हळूहळू आकाशात पतंग दिसायला सुरूवात होत असे.....!
नगर म्हणजे वाडे,उंच इमारती,जवळजवळ घरे, लांबलचक गच्च्या,उंच माळवदं मोठया पत्र्याच्या शेड,मोठी मैदान,रस्ते असा नगरचा सगळा पसारा असायचा....
पतंगचा सिझन आला की या प्रत्येक ठिकाणाहून पतंग उडवले जायचे..
अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यत पतंग उडवण्याचा शौक सगळ्यांनाच असायचा....
पावसाळा संपला की वातावरणात एक वेगळा उत्साह असायचा...
हवेतील ओल निघून गेलेली असायची.
साधारणपणे दिवाळी नंतर नगरमधे पतंग उडवायचे वेध लागायला सुरूवात व्हायची...
पतंग उडवायला सुरूवात झाली की हा सिझन साधारणपणे संक्रान्ती पर्यंत चालत असे....
त्या नुसार सर्व जण पतंग उडवायची तयारी सुरू करायचे...
*नगरचा पतंग म्हणजे एकदम वेगळा असे.*
*त्यास नगरी टच असे...*
*कारण वेगवेगळ्या आकाराचे पतंग हे नगरमधेच तयार होत असत.....*
आपण गंजबाजारात गेलं की जामगावकरच्या दुकाना समोर कांतीलाल साकळचंद यांचे टेलरिंग साहित्य मिळायचे आडवे दुकान होते.
तिथं सर्व प्रकारचे धागे मिळायचे....
साखळी छाप १० नंबर व घोडा छाप ४०नंबर बारीक धाग्याचा रिळ त्या काळात मांजासाठी खूप प्रसिध्द होता....
काही जण जाड तर काही जण बारिक धागा पण मांजा साठी वापरायचे...
तसेच पुढे गेलं काळूराम मंगळचंद कोठारीकडे तिथं मांजा तयार करायची शिरस व काच पावडर मिळायची... तसेच बेल व शिरसमधे टाकण्यासाठी रुमा मस्तकी मिळायची त्यामुळे मांजा मजबूत होत असे....त्या काळात या वनस्पतीचा भाव दहा रुपये तोळा होता.
आज अडीशे रुपये तोळा आहे.
गंजबाजार म्हणजे या कामासाठी एकदम फेमस असायचा...
गंजबाजारात आत घुसले की सर्व साहित्य तिथं मिळत असे....
त्या काळात गंजबाजारात भोसले फुटाणेवाले शेजारीच शेख पतंगवाल्याचे दुकान होते.,..
त्यांच्या दुकानात भिंतीवर आडवी सुतळी बांधून वेगवेगळ्या प्रकारचे पतंग वरुन खाल पर्यंत लावलेले असायचे....... शेख फॕमिली हे पतंग आपल्या समोरच बनवत असत.
त्यात मोठा रब्धान,छोटा रब्धान,छोटी टुक्कल मोठी टुक्कल,गोंड्यावाला अशा वेगवेगळ्या आकाराचे पतंग रुबाबात उभे असलेले दिसायचे....
*या साठी उभा चौकोन व आडवा चौकोन असे कागद कापून पतंग तयार होत असे.*
*या पतंगाच्या कागदाला ताव म्हटले जायचे*....
या पतंगला लावण्यासाठी लागणाऱ्या बांबूच्या काड्या बुरुड गल्लीतून यायच्या किंवा वेळ असेल तर बांबू कापून पाहिजे तशा काड्या तयार केल्या जायच्या...
या काड्या सुद्धा एकसारख्या व एका साईजच्या असत....
चाकूने त्या चांगल्या तासून घेतल्या जात असत.......
नगर मधील काही अवली अमरधाम मधून तिरडीचा बांबू आणून पतंगाच्या काड्या बनवत असत.
मांज्या गुंडाळण्यासाठी चकरी पण बाजारात मिळायची.या चक-या परदेशी गल्लीतील अशोक ब्रश कारखान्यात तयार व्हायच्या.....
यात लहान मोठी साईज पण असायची..मधे चाक लावल्यामुळे या चक-या मस्त फुगीर दिसायच्या.
लहान चक-या दोन चाकाच्या असायच्या.
मोठ्या चक-या मधील चाका सह तीन चाकाच्या असायच्या.
यावर सुतवलेला मांजा मस्त गुंडाळला जायचा.......
हा मांजा बनवायची पण एक पद्धत होती. गंजबाजारातून शिरस ती जाड पापडा सारखी मिळायची.ती शिरस फडक्यात घेऊन वरवंट्याने किंवा दगडाने बारीक करावी लागे....
तसेच बाजारातून हाॕटेल मालकाची नजर चुकवून सोडा वाॕटरच्या बाटल्या आणायच्या...
त्या बाटल्यांचे तुकडे करुन खलबत्त्यात ते काचेचे तुकडे बारीक कुटायचे.
नंतर ती काचेची पावडर चाळून घ्यायची.
ती पावडर पिठी साखरे सारखी बारीक झाली की मस्त पुडीत बांधून ठेवायची......
मांजा तयार करण्यासाठी दुपारची वेळ आदर्श असायची.त्या साठी गांधी मैदान नाही तर किल्ल्या जवळचे मैदान योग्य असायचे.
मांजा सुतवण्या आधी एक डबा लागत असे.
शिरस शिजवण्यासाठी तीन दगड लावून चूल करायची.
त्यावर डबा ठेवायचा.
काड्या काटक्या वा रद्दीचे कागद घालून डब्यातील शिरस चांगली शिजवून घेतली जायची.
त्यात आपल्या आवडीचा रंग टाकायचा....
डबा खाली उतरवून डब्याच्या मागे काडीत दो-याचा रीळ धरुन एकजण बसायचा धाग्याचे टोक दाभणातून बाहेर काढून एकजण दाभण व कापडाची चुटकी धरायचा...
दाभण शिरशीच्या डब्यात बुडवायचे.
हा धागा चुटकीमधून बाहेर ओढून घ्यायचा....
ते टोक कापडाच्या मुठीतून बाहेर काढायचे त्या मुठीत काचेची पावडर असायची.
हा धागा हळूहळू ओढत एक जण लांब जायचा..या टिम मधील काच पावडरची मूठ धरणारा मुलगा अनुभवी असावा लागे....
मांजाला माती लागू नये म्हणून एक जण मधे जाऊन ओला मांज्या वर उचलायचा...
थोडं थांबून लांब गेलेला मुलगा मांज्याचे टोक चकरीला बांधून हळूहळू चकरीवर ताजा मांजा गुंडाळत यायचा...
त्यांचे असे आठ दहा राऊंड झाले की चकरीवर गुंडाळलेला मांज्या छान दिसायचा...
यात गुलाबी लाल किंवा पिवळा कलर वापरेला असायचा.
इतके सर्व व्याप केल्यावर पतंगाचा मांज्या तयार व्हायचा.....
एकामागून एक असे सर्व मित्रांचे मांजे तयार व्हायचे.
*मांज्या तयार करणे हा पतंग उडवण्यातील* *महत्त्वाचा भाग असे.....*
एकदा का मांजा तयार झाला की गंज बाजारातील शेखच्या दुकानात जायचे व आपल्या आवडीचा पंतग निवडायचा.
त्यांची पण एक पद्धत असायची.आवडलेला पतंग हातात घ्यायचा व त्याचे वरचे टोक हातात धरुन तो मागे पुढे हालवून बघायचा...
त्याच्या काड्या तपासून बघायच्या व पतंगाचा ताव निट भरलेला आहे की नाही हे पहायचे...
ताव भरणे म्हणजे पतंगाच्या साईडने पतंग फाटू नये म्हणून पातळ दोरा चारी बाजुने तावात चिकटवलेला असे.
त्यामुळे हा पतंग एकदम टाईट दिसत असे.....
एकदा का पतंगाचे सिलेक्शन झाले की,
एकदम चार पाच पतंग खरेदी केले जायचे......
असे तयार केलेले पतंग नगरमधे चार पाच ठिकाणीच मिळायचे.त्यात कलेक्टर कचेरी मागचा कन्हैया पतंगवाला प्रसिध्द होता....
आशा टाॕकीज मशिदी समोर तसेच बागडपट्टीत पण पतंग तयार व्हायचे.....
परंतु प्रत्येक पतंगवाल्याचे पतंग हे वेगळे असायचे...
तेली खुंटावर अब्दुलाचे पतंग पण छान असायचे...
*मला आठवते या पतंगाला जो पातळ ताव वापरला जायचा,तो नवीपेठेतील साईनाथ सातनूर बदर्सच्या कागद दुकानात होलसेल भावात मिळायचा.*
चला!
आता पतंगाचे सुत्तर कसे बांधायचे ते पाहू...!
पतंग हातात घ्यायचा वरच्या बाजुस क्रास काड्या जिथे आहेत तिथं दोन काड्यामधे खाली वर हळूवार छिद्रे पाडायची....
नंतर पतंगाच्या मधल्या काडीवर एक वीत चार बोटाचे अतंर घेऊन खाली परत दोन छिद्र पाडायची.
त्या नंतर डबल धागा वरच्या खालच्या छिद्रात ओवून गाठ मारायची..
हा धागा धरुन पतंग बॕलन्स करायचा तो जिथे स्थिर होईल तिथे वरती धाग्याला गाठ मारायची की झाले सुत्तर बांधून.... तयार..!
संध्याकाळी वा-याची दिशा कुठे आहे,हे बघून गच्चीवर जायचे....
सुत्तरला मांजा बांधून एकजण पतंग घेऊन लांब जायचा.हवेचा अंदाज घेऊन त्याला उडव म्हटले की तो उडी मारुन तो पतंग हवेत सोडायचा. ...
थोडा मांजा आखडला की पतंग मस्त हवेत तरंगायला लागायचा. .... तो क्षण आमच्या साठी खूप आनंदाचा असायचा.....
हवा जर जोरात असेल तर पतंग डावीकडे कलताना मस्त फरssर असा आवाज यायचा...
.
पतंग फारच कलत असेल तर त्याला खाली उतरवून कन्नी बांधली जायची.
जेणे करुन पतंग वर गेल्यावर जास्त कलत नसे....
नगर मधे सोमवार ते रविवार सकाळ संध्याकाळ पतंग उडायचेच,
परंतु बुधवार व रविवार हे दिवस पतंगासाठी भरगच्च असायचे...
बुधवारी व्यापारी दुकाने बंद असल्यामुळे व्यापारी लोकं पतंग उडवण्याचा आनंद घ्यायचे.
तसेच रविवारी साप्ताहिक सुटी असल्या मुळे आकाशात जास्त पतंग दिसत असत.....
आशा टाॕकीज तात्या टोपे चौक,गांधी मैदान,कोठला मैदान,मिशन हायस्कूल कंपौन्ड वाडीया पार्क सोसायटी हायस्कूल ही ठिकाणे पतंग उडवण्यासाठी प्रसिद्ध होती...
ज्यांना गच्ची नसायची ती मंडळी मोकळी जागा व मोठे रस्ते पतंग उडवण्यासाठी वापरायाची.....
जशी संक्रान्त जवळ येत असे.
तसा पतंग सिझन एकदम पिकवर असे.
संध्याकाळी आकाश वेगवेगळ्या पतंगाच्या रंगाने भरलेले असे....
*तांबटकर गल्लीत फिरोजभाई व त्यांचे मित्र अमरधाम मधून तिरडीचे बांबू आणून पतंग तयार करायचे.त्या मुळे लहानपणीच भूता खेताची भिती निघून गेली होती.....*
*फिरोजभाई माणसाच्या आकाराचा पतंग तयार करुन तो आकाशात उडवायचे तो बघण्यासाठी लांबून पतंग शौकीन येत असत......*
( फिरोजभाई माझ्या काकांचे खूप चांगले मित्र होते , आमचं घर संघाचे होते पण आमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला फिरोजकाका आपल्या घरच्यांसारखेच समजायचे... मी प्रचारक जाण्यापूर्वी काही वर्ष व्यवसाय केला.मला जागा मिळवून देण्यासाठी फिरोजकाकांनी मदत केली होती.संघाचा आहे हे माहित असूनही मशिदीच्या जागेवरील दुकान मला मिळवून देण्यासाठी आपला अधिकार वापरला होता...)
*तसेच परदेशी गल्लीत संध्याकाळी मांजाला छोटे आकाश कंदील लावून पतंग उडवत असत.*
*ह्या आकाश कंदीलची रांग आकाशात खूप छान दिसत असे....*
नगरमधे पतंग उडवताना पतंगाची काटाकाटीची मॕच खेळायला फार मजा यायची....
पतंग व मांजात जोर असेल तर,काटाकाटी लागली की लगेच दुसऱ्याचा पतंग काटला जायचा...
नाही तर,ही पतंगाची जोडी डुलत डुलत लांबवर जात असे.....
तेव्हा मांजाची फार मोठी ढिल द्यावी लागे,
तो पतंग लांब नेऊन काटला की खूप आनंद होत असे...
*काटला रे काटला !*
अशी आरोळी आपोआप बाहेर यायची.
नगरची पतंग उडवायची स्टाईल म्हणजे एकजण चकरी धरायचा व मेन पतंगाचा मालक रुबाबात पतंग उडवायचा.....
तुम्हाला एक गंमत सांगतो,
एक स्थिर राहणारा पतंग आम्ही तो रात्री उडवला.तो छान उंच जाऊन स्थिर उभा राहिला. त्याचा मांजा विटेला बांधून ठेवला. रात्री दर एक तासाने तो पतंग आकाशात आहे की नाही ते बघायचो........
उशीरा झोप लागली. सकाळी उठून बघितलं तर पतंग कुठेतरी बुडाला होता.फक्त मांजा हातात आला.....
नगराच्या सगळ्याच गल्लीत पतंग उडत असे. परंतु इमारत कंपनी,मिशन कंपौन्ड,परदेशी गल्ली,खिस्त गल्ली,माळीवाडा,आशा टाॕकीज झेंडीगेट परिसर,सर्जेपुरा,डाळमंडई तपकीर गल्ली या भागात पतंगाचा जास्त जोर असायचा......
पतंग खेळात दोन प्रकार असायचे एक म्हणजे गच्चीवरुन पतंग उडवणे व दुसरा म्हणजे काटलेले पतंग पकडणे.
एखाद्याने काटलेला पतंग शिताफीने पकडला की तो बाजारातून एखाद्या विजयी वीरासारखा फिरत असे....
पतंग उडवण्याचा नाद म्हणजे तहान भूक विसरून गच्चीवर पतंग उडवले जायचे....
कधी कधी पतंग उडवताना भेळभत्याचा नाष्टा गच्चीवर येत असे...
तो पण वर पतंगाकडे बघूनच खाल्ला जायचा.... पट्टीचे पतंग उडवणारे आपल्या बोटाला पट्टी लावून पतंग उडवत असत....
कारण सारखे पतंग उडवून मांजाने त्यांची बोटं कापत असत.......
जानेवारीत संक्रान्त यायच्या अगोदर पतंग खरेदी करणे,चकरी मांजाने भरणे,पतंगाचे सुत्तर बांधून ठेवणे ही कामे अॕडव्हान्समधे करुन ठेवावी लागत. ..
कारण आख्खा दिवस व रात्र होई पर्यत पतंग शौकीन गच्चीवरच असायचे....
संक्रान्तीच्या दिवशी अगदी नवे कपडे घालून सकाळपासून घरातील सर्व जण गच्चीवर येऊन पतंग उडवत असत...
कधीकधी काय व्हायचे नेमकी संक्रान्तीच्या दिवशी हवा नसायची.
त्यामुळे सर्वाचा मूड आॕफ व्हायचा.त्यामुळे हाच पतंग उत्सव दुसऱ्या दिवाशी त्याच उत्साहात साजरा व्हायचा....
आज त्रेचाळीस वर्ष झाली आहेत..
हे पतंगाचे दिवस अगदी जसे च्या तसे आठवत आहेत....
पतंग पकडण्यासाठी एका गच्चीवरुन दुसऱ्या गच्चीत मारलेल्या उड्याआठवल्या... !
!
कटलेले पतंग पकडण्यासाठी मोठ्या इमारतीच्या टोकाला गेलेले आठवले.
घरात अडकवून ठेवलेले व पकडलेले मोठ्ठे पतंग आठवले.
हे सर्व डोळ्यासमोर आले...
त्या काळात मी आमच्या तिसऱ्या मजल्याच्या गच्चीवरुन कमरे इतका उंच मोठ्ठा पतंग सुतळीने बांधून उडवला होता.,,,,
त्याचा हेलीकाॕफ्टर सारखा आवाज आजही कानात आहे.
ते थ्रिल आठवले की आजही हात पतंग उडवण्यासाठी शिवशिवतात.
पुढे पुढे येतात.....
*पतंगामुळे आपले नगर किती मस्त व रंगीत होते.त्यामुळे पतंग उडविण्याचा आनंद पण मिळत असे ....*
मित्रांनो,
खरे तर हा पतंग उत्सव महीना दोन महिने चालायचा.
परंतु हे दोन महिने वर्षभराची उर्जा देऊन जायचे....
व्यक्तीमत्व विकास म्हणजेच पतंग उडवणे असेही म्हणायला हरकत नाही...
कारण यातून आपल्याला आत्मविश्वास,साहस,रिक्स घेणे, जबाबदारीची जाणिव,टाईम मॕनेजमेंट,डेअरिंग करणे टिम स्पिरिट इत्यादी गुण आपल्यात अपसूकच निर्माण झाले होते.....
काय ?
आठवण आहे का! नगरच्या पतंगाची!
*ज्यांनी नगरमधे पतंग*
*उडवले आहेत*
*ते खरेच भाग्यवानआहेत* ......
*इसलिए*
*मेरे नगरका पतंग उत्सव,*
*हैं महान!*
*इसे कोई भूल नहीं सकता!*
*गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा