" महिला सुरक्षा " - एक मृगजळ
भारतात शेकडो वर्षांपासून " महिला सुरक्षा " हा विषय काळजीचा राहिला आहे.१९४७ पुर्वी परकीय आक्रमणापासून महिला सुरक्षित नव्हती आणि १९४७ नंतर स्वकीयांपासून सुरक्षित नाही.अनेक पूजनीय महिलांनी स्त्री सबलीकरण - सक्षमीकरण - सुरक्षा यासाठी संघर्ष केलेला आपल्याला माहिती आहे.यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले आहे.देश परकीय सत्तेतून मुक्त झाल्यानंतर देशात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत " महिला सुरक्षा " हा विषय फक्त मत मिळविण्यासाठी प्रकर्षाने मांडला गेला.कठोर कायदे फक्त कागदावरच लिहिले गेले.त्याची नीट अंमलबजावणी न झाल्याने त्या कायद्याच्या विषयी मनात भीती निर्माण झाली नाही.त्यामुळे दरवर्षी देशात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.आत्ता पण लग्नाचे वय वाढविणारा कायदा येऊ घातला आहे.यामुळे लवकर लग्न न होता. मुलीला तिच्या आवडत्या क्षेत्रात चांगले शिक्षण घेता येईल आणि देशाच्या प्रगतीस हातभार लावता येईल.....
पण....
" महिला सुरक्षा " देशासाठी मृगजळ ठरणार का....?
भारतीय पुरुष आपल्या पुरुषी अहंकाराचा विचार सोडू शकतो का...?
भारतीय सरकारच्या येणाऱ्या नवीन कायद्याच्या मागे माझ्या देशातील पुरुष ठामपणे उभा राहणार का....?
आता हा प्रश्न का पडावा असे तुम्हाला वाटत असेल ना....
आज एका वाईट प्रसंगातील एक पात्र ठरलो म्हणून नेहमी पडणारा प्रश्न आज व्यक्त होत आहे....
मी अधिकांश वेळा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रवासासाठी वापर करत असतो.पैसे कमी लागतातच पण याचा एक मुख्य फायदा म्हणजे समाजातील वेगवेगळ्या मानसिकतेचे थेट दर्शन घ्यायला मिळते.लोकांचे सामाजिक वागणे कसे असते ते जवळून बघायला मिळते.मनुष्य आपल्या परिचयाच्या व्यक्तीशी जसा वागतो त्याच्या विरुद्ध तो अपरिचित लोकांशी वागत असतो.आपुलकी , आत्मियता , आदर , माणुसकी हे सगळं कुठेतरी हरवले आहे हे लोकांच्या वागणुकीकडे पाहिल्यावर कळते....
पण...
सगळं हेच दिसते का....?
तर नाही...
अनेक चांगले अनुभव पण येत असतात.एखादी ज्येष्ठ व्यक्ती किंवा लहान मुलांना घेऊन प्रवास करणाऱ्या अनोळख्या भगिनींना मदत करणारे हात पण दिसतात.बस प्रवास म्हंटले कि सुट्टे पैसे हे युध्दाचे कारण असते पण स्वतःच्या जवळचे सुट्टे पैसे देऊन या युद्धात मध्यस्थी करणारे पण दिसतात.शहरात आलेल्या नवीन प्रवाशांना प्रवासात योग्य सल्ला देणारे पण दिसतात.शेजारच्या प्रवाशांच्या सामानाची चौकीदार करणारे पण दिसतात...
असे असतानाही चांगली माणसे कमीच असतात....
तर आजच्या प्रसंगाकडे जाऊया....
आज नेहमी सारखाच बसने घरून हडपसरकडे प्रवास करत होतो.सकाळची वेळ असल्याने गाडीत तुडुंब गर्दी होती.( त्या गर्दीत कोरोना जीव गुदमरून मेला असेल कदाचित....) सकाळी बसमध्ये शाळा आणि कॉलेज सुरू झाले असल्याने विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असते.अशा गर्दीत दोन थांबे पुढे गेल्यावर विनाआरक्षित जागा बसायला मिळाल्याने जरा आनंद झाला. कर्वे रोड आणि टिळक रोडच्या गर्दीतून वाट काढत बस हडपसरकडे जात होती आणि आसपास असणाऱ्या गर्दीचे निरिक्षण करत त्यांचे फोन वरचे किंवा आपापसातील संवाद याचा आनंद घेत होतो.नेहमीचाच प्रवास असल्याने रस्ता माहितीचा होता.त्यामुळे कोणता स्टॉप आला याकडे लक्ष न देता लोकांच्या संवादातून आनंदाची आणि दुःखाची गोळा बेरीज करण्यात व्यस्त झालो.
खरं सांगायचं झाले तर सोबत प्रवास करणाऱ्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहिला तर आपले विचार पण आनंदी होतात आणि त्यांच्या संवादातून ते कोणाला तरी आपल्या अडचणी सांगत असतात , त्या ऐकून आपल्या जीवनातील अडचणी खूपच सामान्य वाटतात.
तर प्रसंग असा घडला कि...
आमच्या बस मध्ये महिला कंडक्टर होती.२२-२३ वर्षाची मुलगी हे काम करत होती.गर्दीला न घाबरता ती एकेकाची तिकिटे देऊन , योग्य पैसे घेत - देत होती.मला त्या ताईचे वागणे खूप आवडले , बस मध्ये असलेल्या आणि नवीन आलेल्या सगळ्यांशी तिचे वागणे आदरयुक्त होते.गर्दीत होणाऱ्या चुकीच्या स्पर्शाने ती वैतागली होती पण पूर्ण संयम ठेवून ती गर्दीवर नियंत्रण मिळवत होती.....
गाडी रेसकोर्स मागे सोडून फातिमा नगरला आली . गाडीतील गर्दी कमी झाल्याने कंडक्टर ताईला थोडंसं हलकं वाटत होते.तिच्या चेहऱ्यावरचे आनंदीभाव टेन्शन संपल्याचे दर्शवित होते.आणि अशातच फातिमा नगरच्या बसथांब्यावर कॉलेजचे काही मुल - मुली चढले.मुली आपापल्या सिटवर जाऊन बसल्या आणि मुलं दारात दंगा करत उभे राहिले.या बसथांब्यावर या कॉलेज तरुणांच्या गर्दीत एक दारु पिलेला आडदांड माणूस पण चढला.
हा दारु पिलेला माणूस आणि तरुण मुले दारात उभी असल्याने कंडक्टर ताईने सर्वांना वर येण्याची २-३ वेळा विनंती केली.आणि ऐकत नाही म्हंटल्यावर पुढची तिकीट काढायला निघून गेली. एक मुलगी आपल्यावर ओरडती म्हंटल्यावर पुरुषी अहंकार जागृत होणारच ना. तसं काही तरी झाले आणि दारात उभ्या असणाऱ्या टार्गेट मुलांनी अश्लील कमेंट करायला सुरुवात केली.कंडक्टर मुलीला ते आवडले नाही पण ती ऐकून न ऐकल्या सारखे करून आपल्या कामात व्यस्त झाली.तिला मानसिक त्रास देण्यासाठी मुद्दामहून बेल वाजवणे आणि अश्लील कमेंट चालूच होत्या.
ते जिथे उभे राहून हा नालायकपणा करीत होते , तिथे आजूबाजूला स्वतःला पुरुष म्हणणारे षंढ हे सगळे उघड्या डोळ्यांनी बघत होते. यावर आपणही शांत राहिलो तर स्वयंसेवक म्हणून घेताना मला लाज वाटली असती.माझी जागा सोडून त्यांच्या जवळ जाऊन जरा आवाज चढवल्यावर ते सगळे भानावर आले.आम्ही कुठे काय म्हणालो वगैरे वगैरे कारणे पुढे करायला लागले.मी चिडलोय आणि आपल्या पाठीशी कोणीतरी आहे म्हंटल्यावर त्या कंडक्टर ताईला पण हायसे वाटले आणि ती पण माझ्या आडून त्यांना बोलायला लागली.हे सगळं पाहून आजुबाजुला बसलेले षंढ पण वीरवृत्ती दाखवू लागले.या षंढांमध्ये त्याच परिवहन मंडळात काम करणारा पुरुष कर्मचारी पण होता.मी त्या नालायक मुलांसोबत आजूबाजूला बसलेल्या सगळ्यांना जरा सुनावलेच.गाडीत थांबणे आता आपल्यासाठी धोक्याचे आहे हे समजल्यानंतर ते सगळे आलेल्या बसथांब्यावर उतरून गेलो.मी पण माझा प्रवास जिथं पर्यंत होता तिथे उतरताना ती ताई दारात येऊन मला " धन्यवाद दादा " म्हणाली.
तिने डोळ्यात पाणी आणून दिलेले धन्यवाद मी स्विकारावेत का नाहीत.....?
हा प्रश्न निर्माण होण्याचे कारण म्हणजे अशा घाणेरड्या प्रवृत्ती असणाऱ्या समाजाचा मी घटक आहे.अशा प्रवृत्ती माझ्या आजूबाजूला असताना मी जाणिवपूर्वक अथवा न कळत याकडे दुर्लक्ष करत असतो.असे असताना त्या हतबल बहिणीचे धन्यवाद मी कसा स्विकारु शकतो.....
तसं पाहिलं गेलं तर या घटना आपल्या कोणालाच नवीन नाहीत.रोजच अशा घटनांचे आपण साक्षीदार असतो.आणि यावर खासगीत व्यक्त पण होत असतो.मी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिक वापर करतो त्यामुळे अनेकदा भांडणाचा प्रसंग येत असतो.मालेगाव वरुन पुण्यात येत असताना एकाला तर कोपरगाव स्टॅण्ड वर मारले पण होते.हि तर जुनी घटना.आत्ता १५-२० दिवसांपूर्वी रेल्वेत अशाच एका नालायकाला प्रसाद दिला.....
पण अशा भांडण केल्याने किंवा मारामाऱ्या केल्याने हा प्रश्न संपणार आहे का ? अशाने आपल्या आया बहिणींना मानसन्मान मिळणार आहे का....?
नुसते चांगल्या नोकरीसाठी , अमाप पैसा कमविण्यासाठी शिक्षण घ्यायचे नसते तर चांगला माणूस होण्यासाठी शिक्षण घ्यायचे असते.प्रत्येक घरात आपला मुलगा , भाऊ , नवरा सार्वजनिक ठिकाणी कसा वागतो याचा विचार कधी केला जाणार ? देशात कितीही कठोर कायदे केले तरी महिलांवर पुरुषी अहंकाराचे वर्चस्व गाजवणे कमी होणार आहे का ?
या सगळ्याला कारणीभूत असणाऱ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात.पण याचा विचार आपण करत नाही.
महिला हि उपभोगाची वस्तू आहे.मी पुरुष असल्याने तिच्यावर माझा पुर्ण अधिकार आहे आणि तो गाजवणे हा माझा जन्मसिद्ध हक्कच आहे अशी भावना सगळीकडे दिसते.आता परवाचेच उदाहरण बघा ना , एका राजकीय पक्षाचा आमदार भर विधानसभेत महिलांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान करतो आणि त्याचे सहकारी आमदार आणि सभापती यावर मोठ मोठ्याने हसतात.ज्यांच्या हातात आपण सत्ता देतो.त्या सत्तेच्या माध्यमातून नागरिकांना सुरक्षा द्यावी अशी आशा बाळगतो तेच जर अशी वक्तव्ये करीत असतील तर सामान्य नागरिकांनी कसे हि वागले तरी त्यांना रोखणार कोण....?
भारतीय चित्रपटसृष्टी तर अश्लीलतेचे विद्यापीठाच आहे.चित्रपटांचा खरा उद्देश आहे की समाजातील प्रश्नांवर प्रकाश टाकावा आणि त्या माध्यमातून समाजप्रबोधन आणि परिवर्तनासाठी मदतनीस व्हावे.पण हे सगळं सोडायचे आणि अश्लील डायलॉग , न्युड सिन्स यांच्या माध्यमातून तरुण पिढीच्या भावनांना वेगळे वळण देणे.कोणताही पिक्चर आपण पाहिला तर लक्षात येईल की स्त्री पात्रास दुय्यम स्थान दिले आहे.
खरंच भारतीय स्त्री हि इतकी कमकुवत आहे ? ती फक्त उपभोगाची वस्तू आहे ? या देशाच्या उन्नती मध्ये तिचा सहभाग नाही का ?
मला वाटते की जेवढा त्याग , समर्पण या देशासाठी पुरुषांनी केले आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात महिलांनी केले आहे.महाराणा प्रताप , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखे वीर पुरुष आणि लोकमान्य टिळक , स्वातंत्र्य वीर सावरकर , भगतसिंग , डॉ.हेडगेवार , डॉ.आंबेडकर यांच्या सारख्या क्रांतिकारकांना जन्म घालणारी माऊली उपभोगाची वस्तू कधी झाली....
राजमाता जिजाऊंचा वारसा सांगणारे आपण इतके नीच कसे होऊ शकतो ना....
काहीही झाले तरी माझ्या देशात अशा प्रवृत्तींना स्थान नाही.मी याला सतत विरोध करणारच यात शंकाच नाही...
पण...
तुमचे काय....?
तरीही...
एक प्रश्न सतावतोय....
त्या छोट्या ताईने डोळ्यात पाणी आणून दिलेले धन्यवाद मी एक भाऊ , एक भारतीय हिंदू नागरिक म्हणून कसे स्विकारु....
( युवराज )
वाह !
उत्तर द्याहटवाधन्यवाद डॉक्टर साहेब
हटवास्त्रियांची तसेच पुरुषाची सुध्या मानसिकता बदलणे गरजेचे आहे,छान initiative घेतला आपण
उत्तर द्याहटवाबरोबर आहे...
हटवामानसिकता बदलण्याची गरज आहे...
प्रतिसादा बद्दल धन्यवाद 🙏
खरंय दादा...
उत्तर द्याहटवाप्रतिसादाबद्दल धन्यवाद 🙏
हटवावाह
उत्तर द्याहटवाप्रतिसादाबद्दल धन्यवाद 🙏
हटवाNice article
उत्तर द्याहटवाहे भान सतत बाळगायला हवे प्रत्येकाने.
उत्तर द्याहटवाहे सगळं वाचल्यावर , एक मात्र कळत की , समाज जनमानसात वावरत असताना , स्त्री स्वातंत्र्य आणि इतर काही गोष्टींवर फक्त बडबड करणारे खूप आढळतात , पण त्या बद्दल दोन हात करण्याची खरी हिम्मत ही फक्त आणि फक्त तुम्हा सारख्या विजीगिषु वृत्तीच्या स्वयंसेवका कडेच असू शकते हे मात्र नक्की ।।।।।।स्वतःला सांभाळून सगळं करत जावा
उत्तर द्याहटवाप्रतिसादाबद्दल धन्यवाद 🙏♥️🙏
हटवाउत्तम लिखाण ..
उत्तर द्याहटवामार्मिक💯
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवानेहमी कोणी मला काही टॅग केलं तर मी लगेच ते अनटॅग करतो,पण तुमचा लेख वाचून तो माझ्या प्रोफाइल वर कायमस्वरूपी टॅग करून रहावा असं वाटलं...स्वयंसेवक म्हणून आपल्या मनात ह्या भावना असतातच पण कायदे करून किंवा धाक दाखवून फार फार तर लोकं तात्पुरती घाबरतील,एखादी कृती करायला कचरतील पण त्या भावना आतमध्ये दबलेल्या राहतीलच पण महिलांविषयीचा आदर,योग्य वागणं,बोलणं हे स्वाभाविक बनलं, स्वभावाचा भाग बनलं तरच त्या कंडक्टर ताईला कोणताही त्रास न सहन करता आपलं काम मनाप्रमाणे आणि निर्भयपणे करता येईल...
उत्तर द्याहटवाअगदी मनातलं लिहिलत😊
प्रतिसादाबद्दल धन्यवाद 🙏
हटवाNice👌👌
उत्तर द्याहटवाMast👌
उत्तर द्याहटवाकायदे गरजेचे आहेतच पण आपण जो मूळ प्रश्न उपस्थित केला आहे तो जास्त योग्य आहे. आणि कृतीही जी , आपण केल्याने इतरांमध्ये ती करण्याची मानसिकता जागृत झाली ( लाजेखातर ). पण तरीही आपल्याला हे करत रहावे लागणार.
उत्तर द्याहटवाएक मात्र खटकणारा उल्लेख की , त्या मुलीच्या खात्यातील पुरुष सहकाऱ्याने डोळेझाक करावी. पण यापुढे तो , अशा प्रसंगांना सामोरे जायला धजावेल , त्याच्यात ते धारिष्ट्य नक्की येईल अशी आशा करुया.
युवराज जी , आम्हालाही अशा प्रसंगी उभं राहायला पाहिजे आणि लोक साथ देतात हे पुन्हा एकदा कळालं , फक्त पुढाकार घ्यायला लागतो , ते तुम्ही केलंत .
युवराजजी घटना तर आजूबाजूस घडत असतातच. त्याकडे डोळसपणे पाहण्याची दृष्टी आणि विश्लेषण करण्याची वृत्ती तुमच्याकडे आहे. सारासार विवेक हा भाग अभ्यासक्रमात नसल्याने या मूलभूत कौशल्याकडे समाजाचे दुर्लक्ष होत आहे. तुमच्यासारख्या व्यक्ती समाजात आहेत. संख्या वाढायला हवी.
उत्तर द्याहटवाप्रतिसादाबद्दल धन्यवाद 🙏
हटवा